Ad will apear here
Next
‘ती दिवाळी विसरणं शक्य नाही...’


‘लहानपणच्या दिवाळीची मजाच काही निराळी होती. थंडी, कीर्तन, फराळ, किल्ले बनविणं आणि पाहायला जाणं, भरपूर दिवाळी अंक वाचणं, मित्र आणि नातेवाईकांना भेटणं, या सगळ्यामुळे खूप मजा यायची. आता सगळीकडे सुबत्ता आली असली, तरी ओढ कमी झाल्याचं जाणवतं. त्यामुळेच ती दिवाळी विसरणं शक्यच नाही....’... आपल्या लहानपणीच्या दिवाळीच्या आठवणी सांगताहेत ज्येष्ठ लेखक आणि अनुवादक रवींद्र गुर्जर... ‘आठवणीतली दिवाळी’ या सदरात... आजपासून दिवाळीचा संपूर्ण आठवडाभर सुरू राहणार असलेल्या या सदरात विविध क्षेत्रांतल्या ज्येष्ठ व्यक्ती आपापल्या आठवणीतल्या दिवाळीबद्दल सांगणार आहेत. आपल्या प्रत्येकालाच दिवाळीच्या स्मरणरंजनात दंग होण्याची संधी देणारा ‘बाइट्स ऑफ इंडिया’चा हा दिवाळी अंकच आहे....
.............
माझ्या लहानपणच्या म्हणजे साधारणतः सन १९५० ते १९६० या कालावधीतल्या दिवाळीबद्दल मी सांगणार आहे. पहिली गोष्ट मला आठवते ती म्हणजे थंडी. त्या वेळी दिवाळीच्या काळात म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये चांगली जाणवण्यासारखी थंडी असायची. आता ती थंडी गायब झाली आहे. दुसरं म्हणजे नरक चतुर्दशीला पहाटे पाच वाजता उठून सूर्याचा प्रकाश पडण्यापूर्वी आंघोळ करणं, ही त्या वेळची एक महत्त्वाची गोष्ट होती. पाच वाजता पहाटे उठून अभ्यंग स्नान केलं जायचं. आई अंगाला तेल लावायची. उटणं वगैरे लावून आंघोळ करून साडेपाच वाजताच आम्ही नवीन कपडे वगैरे घालून तयार झालेले असायचो. पन्नास साली मी चार वर्षांचा होतो. त्यानंतर मग देवाला फराळाचा नैवेद्य दाखविणं आणि थोडा फराळ करणं, या गोष्टी असायच्या. पहाटे पाच वाजता रेडिओवर कीर्तन व्हायचं. त्या काळातले राईलकरबुवांसारखे अनेक प्रख्यात कीर्तनकार रेडिओवरच्या त्या कार्यक्रमात कीर्तन करायचे. त्यात अनेक महिला कीर्तनकारही होत्या. दर वर्षी नरकासुरवधाचं एकच आख्यान असायचं; पण ते आम्ही ते आवडीनं ऐकायचो. कीर्तन झालं, की बिस्मिला खाँ यांची सनई लागायची आणि मग भक्तिसंगीत लागायचं. फराळ करून झाला की फटाके. त्या वेळी तीस- चाळीस रुपयांचे फटाके पुष्कळ व्हायचे. नंतर हळूहळू त्यांचा खर्च वाढत गेला. 

फराळाचे पदार्थ आयते आणायचा प्रकार त्या वेळी नसायचा. दोन-तीन दिवस आधीपासून चकल्या, लाडू, कडबोळी, चिवडा हे पदार्थ बनविण्याचं काम घरात सुरू व्हायचं. आम्ही त्या वेळी पुण्यातल्या भरत नाट्यमंदिरासमोरच्या बिल्डिंगमध्ये राहायचो. त्या बिल्डिंगच्या खाली सलून, चहाचं दुकान आणि आणखी काही बारीक-सारीक दुकानं असायची. या सगळ्यांना फराळाच्या पुड्या नेऊन देणं, असा एक कार्यक्रम असायचा. सांगायची गंमत म्हणजे मी अगदी साठ वर्षांचा होईपर्यंत या दुकानदारांपैकी कोणाशी भेट झाली, तर ते आवर्जून सांगायचे, की तुमची आई आम्हाला फराळाच्या पुड्या द्यायची. ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट असायची. 

लक्ष्मीपूजनाला आमच्या बिल्डिंगच्या जवळजवळ तास-दीड तास फटाक्यांचा कार्यक्रम असायचा. त्यात हजार-दहा हजार फटाक्यांच्या माळा, लक्ष्मी फटाका, अॅटमबॉम्ब वगैरे फटाके वाजवले जायचे. आम्ही मध्यमवर्गीय होतो आणि आजूबाजूलाही सगळी मध्यमवर्गीय मंडळीच होती; पण एकमेकांमध्ये प्रेम प्रचंड होतं. एकमेकांकडे फराळाला जाणं, फराळ पाठवणं, नातलग-मित्रमंडळींकडे रोज एका कोणाकडे तरी जाणं-येणं चालायचं. गप्पागोष्टींमध्ये वेळ खूप चांगला जायचा. चांगले सिनेमे पाहिल्याने सहावीत असताना मला सिनेमाची आवड लागली. त्या वेळी पाच-सहा आण्यांमध्ये सिनेमाची तिकिटं यायची.  सिनेमाचा आपला खर्च आपल्या उद्योगातून निघावा, या उद्देशानं मी त्या वेळी दिवाळीआधी फटाके, तेल, साबण आदींची विक्री सुरू केली. विक्रीचा अनुभव आपल्याला मिळावा, लोकांच्या गाठीभेटी व्हाव्यात, हाही उद्देश त्यामागे होता. त्यातून ५०-१०० रुपये मिळायचे. मग त्यातून बटाटेवडा खाल्ला, कुठे चहा प्याला, अशा बारीक-सारीक गोष्टींचंही तेव्हा आकर्षण होतं. आणि मुख्य म्हणजे एखादा सिनेमा बघितला जायचा. सगळे मिळून किंवा भांवंडं मिळून सिनेमा पाहायला जायचो. 

त्या वेळी आम्ही भावंडं आकाशकंदील तर घरी बनवत होतोच; पण आणखी एक वैशिष्ट्य होतं, ते म्हणजे किल्ला बनविण्याचं. जवळपासच्या भागातून आम्ही माती आणायचो. सिंहगड किंवा पर्वती डोळ्यासमोर असायची. साधारण त्याच्याशी साधर्म्य असेल, असा डोंगर तयार करायचो. शिवाजी, मावळे, गाय, बैल वगैरे प्राणी मातीचे आणायचो. दिवाळीच्या दोन-तीन दिवस आधी त्याच्यावर हळीव टाकायचो. तेवढ्या दिवसांत हळीव रुजायचे आणि जंगल झाल्यासारखं वाटायचं. बाहेर जास्त किल्ले व्हायचे नाहीत; पण त्या वेळी चिमण्या गणपतीजवळ गोपाळ हायस्कूलमध्ये किल्ला मोठ्या प्रमाणावर केला जायचा. रेल्वेचा रूटही असायचा. किल्ला आणि रेल्वे हे गोपाळ हायस्कूलचं वैशिष्ट्य असायचं.

त्यानंतर महत्त्वाचा विषय दिवाळी अंकांचा. त्या वेळी ‘सकाळ’सारख्या वर्तमानपत्रांचे दिवाळी अंक यायचे. ‘सकाळ’चा मोठा अंक असायचा. त्यानंतर त्या वेळचे (साधारण १९५५च्या नंतर) महत्त्वाचे दिवाळी अंक म्हणजे सुगंध, आवाज, मोहिनी, वसंत. अशा अंकांची आम्ही वाट पाहायचो. ५०-६० दिवाळी अंक निघायचे. सगळे अंक विकत घेणं काही परवडायचं नाही; पण मग लायब्ररी लावायचो आणि दोन-तीन अंक विकत आणले जायचे. ‘सुगंध’मध्ये त्या काळातल्या प्रसिद्ध लेखकांच्या कथा असायच्या. त्या आवर्जून वाचायचो. अण्णा भाऊ साठेंच्या कादंबऱ्या असायच्या. दिवाळी अंकांचं आकर्षण होतंच, पुढे मी त्या उद्योगातच पडलो. लेखन-प्रकाशन सुरू झालं. त्यामुळे दिवाळी अंकांशी अधिक जवळून संबंध आला. 

आणखी एक महत्त्वाचा प्रकार त्या वेळी होता, तो म्हणजे दिवाळीच्या सुट्टीत बाहेरगावी, नातेवाईकांकडे जाऊन राहणं. काही वेळा मावशीची, मामाची मुलं आमच्याकडे यायची. तेव्हा खूप आनंदात काळ जात असे. आता परिस्थिती बदलली आहे. वर्षभरात साधा फोन होणंही मुश्कील झालंय. तसं व्हायचं खरं तर कारण काहीच नाही; पण तसं झालंय हे खरं. त्या वेळी गरिबी होती. म्हणजे खाण्यापिण्याची ददात नव्हती; पण मिळकत जी होती, त्यातून जेमतेम खर्च भागेल अशी स्थिती होती. आता भरपूर उत्पन्न आहे, सुविधा आहेत. तरीसुद्धा मित्रांना, नातेवाईकांना भेटावं, ही ओढ कमी झाली आहे. लोक आत्मकेंद्रित झाले आहेत, ही परिस्थिती आहे. त्या वेळी दिवाळी फार आनंदात जायची. दिवाळी यायची आम्ही वाट बघायचो आणि दिवाळी गेली की वाईट वाटायचं. आता काळ असा आलेला आहे, की दिवाळी कधी आली नि कधी गेली, हे कळतच नाही. त्यामुळे जुन्या काळची दिवाळी कधीही विसरणं शक्य नाही.

(शब्दांकन : अनिकेत कोनकर, व्हिडिओ : स्नेहा कोंडलकर)

(‘आठवणीतली दिवाळी’ या दिवाळी अंकातले सर्व लेख एकत्रितरीत्या येथे उपलब्ध होतील.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZVNBH
Similar Posts
आठ वर्षांच्या ओवीचं कीर्तन दिवाळी पहाट विशेष कीर्तन कीर्तनकार : ओवी अमोल काळे, पुणे (वय वर्षे आठ - २०१७मध्ये) हार्मोनियम : स्वामिनी कुलकर्णी गायन : मोहिनी कुलकर्णी, अमोल अशोक काळे व्हिडिओ : देवेंद्र परांजपे, कोहिनूर इलेक्ट्रॉनिक्स प्रस्तुती : BytesOfIndia.com
‘दिवाळी स्मरणात राहणारीच असते’ ‘दिवाळी, मग ती कुठल्याही काळातली असली, तरी स्मरणात राहणारी आणि वाट पाहायला लावणारी आहे. आताही आम्ही दिवाळीची तितक्याच उत्सुकतेने वाट पाहत असतो. त्या काळात फक्त प्रत्यक्ष भेटीला जास्त महत्त्व होते...’ सांगत आहेत कोकण मराठी साहित्य परिषदेचे रत्नागिरी येथील विश्वस्त अरुण नेरुरकर ... ‘आठवणीतली दिवाळी’ या सदरात
‘मोहक दिवाळीच्या रम्य आठवणी’ ‘त्या वेळी कार्तिक कंदील बनविण्यापासून आईच्या हातचा वैविध्यपूर्ण फराळ चाखण्यापर्यंतची दिवाळीतली प्रत्येक गोष्ट मोहक होती. आप्तेष्ट जमल्यावर येणारा आनंद तर अवर्णनीयच. आता मात्र त्या वेळची थंडी आणि नात्यांची ऊब या दोन्ही गोष्टी कमी झाल्या आहेत...’ सांगत आहेत पुण्यातील ‘सिम्बायोसिस’ या नामवंत शिक्षणसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि कुलपती डॉ
दिवाळीच्या आठवणी जागवणारी चित्रपटगीते ‘सुनहरे गीत’ या सदरात दर वेळी आपण एखाद्या कलावंताबद्दलची माहिती घेऊन त्याच्या एखाद्या गीताचा आस्वाद घेतो. आजचा लेख मात्र वेगळा आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सदरलेखक पद्माकर पाठकजी यांनी स्मरणरंजनपर लेख लिहिला आहे. त्यांच्या लहानपणी किंवा तरुणपणात दिवाळीच्या काळात रेडिओवर ऐकल्या जाणाऱ्या ‘सुनहऱ्या’ चित्रपटगीतांच्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language